बांगड्याचे तिकले (Malvani Recipes)
माशाच्या कढी प्रमाणे जास्त पाणी न ठेवता ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत शिजवलेले बांगड्याचे टिकले/तिकले आणि गरमागरम भाकरी वा चपाती ही आणखीन एक तोंडात पाणी आणणारी मालवणी पाककृती आहे. कोकण पट्टयात निव्वळ बांगड्याच्याच १५-२० पाककृती आढळतील.
साहित्य:
७-८ ताजे बांगडे तुकडे करून घ्यावेत
८-१० सुक्या मिरच्या किवा हिरवा मसाला (मिर्ची पावडर) ४ टेबलस्पून
धने १ टेबलस्पून
४ तिरफळे
४-५ आमसुले (कोकम)
तेल फोडणीसाठी
मीठ चवीनुसार
हळद चिमुटभर
१ ताजा नारळ
मोहरी अर्धा टेबलस्पून
१ कांदा.
कृती:
प्रथम नारळ खवून घ्यावा, खववलेले खोबरे सुक्या मिरचीचे तुकडे अथवा मिर्ची पावडर, हळद व धने मिक्सरला बारीक वाटून घ्यावेत. एका पातेल्यात मोहरी व बारीक चिरलेल्या कांद्याची तेलावर टाकून फोडणी द्यावी. कांदा लालसर होताच त्यामध्ये बांगड्याचे तुकडे टाकावेत व लगेच मिक्सर मधील वाटप, तिरफळे व आमसुले (कोकम) घालावीत. कढीप्रमाणे पाणी जास्त न घालता सैल होण्यापुरते पाणी घालून जाडसरपणा टिकउन शिजू द्यावे. एक उकळी आल्यावर उतरवावे.
बांगड्याचे तिकले गरमागरम भाकरी किंवा चपाती बरोबर खावे.











