मालवणी मच्छी कढी: (Malvani Recipes)
मालवणी मच्छी कढीसाठी विशेष करून समुद्रातील कर्ली, बांगडा, सौंदाळे, पेडवे, पापलेट हे मासे लोकप्रिय आहेत. दुपारच्या जेवणासाठी कोकणातील घराघरात माश्याच्या काढीची ९०% तयारी अगोदरच झालेली असते. बायका बाजारातून येणाऱ्या माशांची वाट पाहत असतात. मासे आले की जेवण तयार, मासे अगदीच मिळाले नाहीत तीच काढी माशाशिवाय शिजउन जेवायचीही तयारी असते. अशा काढीला फुटी काढी किंवा गोव्याच्या भाषेत सवराक म्हणतात.
साहित्य:
प्रथम साधारण अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून तुकडे करून घ्यावेत.
एक मध्यम आकाराचा कांदा फोडणीसाठी बारीक चिरावा
लसणीच्या चार पाकळ्या लागतील.
२ चमचे हिरवा मसाला
दोन ओल्या मिरचीच्या तुकडे करून
एक ताजा ओला नारळ खवून घ्यावा
मीठ
चिंचेचा/आमसुलाचा भिजत टाकून केलेला रस वाटीमध्ये घ्यावा
अर्धा चमचा हळद
दोन चमचे धने
त्रिफळे ४
तेल
कोथींबीर.
कृती :- प्रथम खवलेला नारळ मिक्सरच्या भांडयात घालून त्यात थोडे पाणी टाकावे आणि मग अर्धा चमचा हळद व २ चमचे हिरवा मसाला व दोन चमचे धने घालून बारीक वाटून घ्यावे.
ग्यासवर भांडे ठेवून गरम झाल्यावर त्यात २ चमचे तेल टाकावे. तेल तापताच कांदा व लसूणची फोडणी द्यावी. कांदा गुलाबी लालसर होताच त्यामध्ये मिक्सर मधील वाटपामध्ये मासे कालवून ते फोडणीत टाकावे. चार पेले पाणी घालून झाकण ठेवावे व थोड्याच वेळाने उकळी येण्या पुर्वी वाटीतील चिंचेच्या/आमसुलाच्या रसाचे दोन चमचे पाणी, चार त्रिफळे, ओल्या मिरचीचे तुकडे टाकावेत.
कढी मधील पाणी आवश्यकतेनुसार वाढवून मीठ टाकावे व गरज वाटल्यास लाल तिखट टाकावे. कोथींबीरीची पाने टाकून मंद ग्यासवर एक-दोन उकळ्या काढाव्यात. जास्त उकळू नये, अन्यथा मिश्रण फुटून उतू जाण्याची शक्यता असते.
कोकणी माणूस या काढीने जेवताना भाताचा अक्षरश: फडशा पडतो.











