सुक्या बांगड्याची / जोवल्याची चटणी (Malvani Recipes)
मोठ्या पावसात बरेचदा मासे मिळणं दुरापास्त होतं अशावेळी समुद्राच्या माशांची चटक असलेल्या बहुसंख्य मालवणी लोकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. मे महिन्याच्या बाजारातून आणलेले सुके बांगडे किवा जोवला (गोलीम - बारीक सुकी सुंगटे) यांची मग आठवण येते. डाळ-भात आणि चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा अशी दुपारच्या जेवणाची तयारी होते किंवा अगदी पाचच मिनिटात कांदा खोबरं आणि सुका जोवला तव्यावर परतून लाळ टपकवणारी कोशिंबीर केली जाते. या ठिकाणी दिलेली कृती चटणीची आहे त्यात सुक्या बांगड्या ऐवजी सुका जोवलाही वापरता येतो आणि वेगळ्या चवीची चटणी तयार होते.
पूर्व तयारी: सुका बांगडा चुलीतल्या निखाऱ्यावर अथवा ग्यासच्या ज्योतीवर भाजून घ्या व नंतर व्यवस्थित साफ करून बारीक तुकडे करा. जोवला असल्यास रेती (समुद्रातील वाळू) नाही याची खात्री करा व नंतरच तव्यावर परतून कुरकुरीत करा.
साहित्य:- तव्यावर भाजलेला १०० ग्राम गोलीम किंवा निखाऱ्यावर भाजून बारीक केलेला एक सुका बांगडा, एक इंच आले, ४ लसूण पाकळ्या, १ चमचा मिरची पूड (हिरवा मसाला ), १ खवलेला ताजा नारळ, मीठ, हळद
कृती:- प्रथम खवलेला नारळ, १ चमचा मसाला, चिमूटभर हळद, आल्या-लसणाची पेस्ट मिक्सरला लाऊन किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्या. पाणी अजिबात वापरू नका. या वाटपाच्या गोळयामध्ये चवीपुरते मीठ व सुक्या बांगड्याचे तुकडे किंवा भाजलेला गोलीम व्यवस्थित मिक्स करा. बस्स, चटणी तयार. या चटणी बरोबर भाकरी किंवा चपाती फारच छान लागते.











