बारको तथा बाळकृष्ण किर्लोस्कर, उंची ५ फुट, कुरळे केस, मोठे डोळे, बारीक देहयष्टी, भेदक नजर, शि़क्षण १२वी नापास, कायम इनशर्ट. एकंदरीत ध्यानच. गावात, घरची माणसे त्यात करुन लहान मुले समोर "बाळाकाका" म्हणतात. अपरोक्ष व संपुर्ण पंचक्रोशीत "बारको" म्हणूनच प्रसिध्द.
आयुषात बारक्याने लग्न व दोन मुले, मोठी मुलगी व एक मुलगा ही दोन चांगली कार्ये केली. काम म्हणाल तर अनेक प्रकाचे उपद्व्याप केले. तुम्ही त्याला काम म्हणा अगर काहीही म्हणा, शेतीपासून चारहात लांब. तरी पण बारक्याची महती पंचक्रोशीत घराघरात. बारको म्हटल्यावर सर्वाना आठवणारी मुर्ती.
कारण ही तसेच आहे. सामाजिक कार्य ,लग्न, जत्रा, गाव जेवण, मयत व निवडणूका यामध्ये बारको नाही असे होणेच नाही. असा सर्वव्यापी माणूस त्याला दोन व्यसने, एक मटका लावणे व गजाली मारणे. सकाळ झाली की, पानपट्टीवर दिवस सुरु तो रात्रीच्या शेवटच्या गाडीपर्यंत विविध उपक्रम साजरे करुन दिवसभराची कमायी करुन घरी.
मालवणीत "हळकुंडाच्या पदरात शेळकुंड" म्हणतात. इथे उलट. बायको, मुले व पेन्शनर आई यांच्या पदरात हे "शेळकुंड" होते. आई म्हणजे त्याची "आये" सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पुरविणारी घरगुती पतसंस्था व हक्काने जेवण वाढणारी, बायको हक्काने भांडण्यासाठी व सर्व सांसारीक जबाबदार्या पेलणारी, हुशार,कष्टकरी स्त्री कशी काय याला मिळाली हा प्रश्नच ? त्यापेशा याच्या बरोबर कशी राहते हा त्यापेशा मोठा प्रश्न. मुलगी समंजस, हुशार तसाच मुलगा. एकंदरीत कुटूंबात कर्ता पुरुष हा मानाने तोच होता.
दोन भाऊ मुंबईला व्यवस्थीत नोकरीला. मोठ्याचे याच्यावर बारीक लक्ष. कारण ही तसेच, रोजच्या आर्थिक उलाढाली व समस्या यामुळे जी काही सुनामी, फयान निर्माण व्हायची त्यावर तोड्गा काढणे. प्रसंगी बारक्याला शिस्त लावणारे दोनच माणूस, हा भाऊ व मोठ्या बहिणीचा मुलगा, या दोन व्यक्ती सोडल्या तर बारक्यावर कोणाचीही हुकुमत नाही.
स्वयंभु देवस्थानाप्रमाणे बारका हा यांच्या अपरोक्ष घरात सर्वेसर्वा होता. त्याची खासियत म्हणजे त्याचे उपद्व्याप व पैसा मिळविण्याचे त्याचे मार्ग. त्यातील जसे आठवतील तसे कीस्से मी सांगणार आहे.
एसटीचा तिकीट
लग्नाचो सिझन संपत इलो. पण गाड्येंका गर्दी बेसुमार; नेहमीप्रमाणे बारको कणकवलीत सात आणि आठ नंबर प्लॅट फॉर्मवर टकामका करीत होतो. इतक्यात चुलत भयन चेडवाक घेवन दिसली. नविन जोडा आणि सासरो सगळ्याका घेवन भयन मामाच्या देवाच्या पाया पडाक येता, ह्या ह्येना कधीच ओळख्ल्यान.
बारको लगेच गजालीक इलो. भयनीन कपाळाक आठ्ये घातल्यान. पण नाईलाजान "बाळ्या बरा झाला भेटलस तो, जावयांका देवाक पाया पडाक न्हेतय" सांगीतल्या बरोबर बारक्यान हसान अगदी आपुलकेन जावयांच्या हातात हात दिल्यान. " चला चाय घेवया जावयानू " बिचारो जावय नविन आदरातिथ्यात भारावलो. तेच्यापेक्षा तेचो बाप. चाकरमानी म्हातारो गळाक लागतलो ह्या बारक्यान बरोबर ओळखल्यान. चहा पिताना आणि गाडी लागापर्यंत हे गाव गजाली बारक्यान लावल्यान.
जावय हल्लीचो आयकत रवलो. बाप मात्र गजालीत रमान गेलो, तितक्यात गाडी इली. पाजया उंदरासारखा सराईत पणे बारको गाड्येत शिरलो. ही गर्दी, तरी बारक्यान पुढे तीन सीट अडवल्यान. जावय, म्हातारो आणि भाचयेक बसवल्यान. चुलत भयनीक अॅडजेस्ट करुन तेच्या भाषेत दिल्यान. म्हातारो आणखीनच भारावलो. स्वतः कंडक्टरच्या बाजूक स्टायलीत उभो. गाडी सुरु झाली. तसो बारक्यान तंबाखु भरल्यान आणि ओळखीच्यांका नजरेन, हातान खुणावत भयनीक घेवन चलतय सांगत होतो. इतक्यात कंडक्टरान तिकीट मागल्यान, मघापासून म्हातारो लक्ष ठेवतच होतो. सासरेबुवान "पावन्यानू मी काढतय" करुन पाचशेची नोट काढल्यान. बारक्यान आपलो उगीच 'रवांदे पावण्यानू, मी काढतय' करुन आव आणल्यान. अर्थात तिकीट काढूचा नाय होताच.
सासरेबुवानी जोर करुन मास्तर, कीर्लोस पाच द्या, करुन पाचशेची नोट पुढे केली. बारको आपलो उगीच रवांदे करीत हात पुढे करुन गर्दीतसून पुढे इलो नी नोट बरोबर हातात घेतल्यान, काढलेली तिकीटा आपल्या खिशात ठेवन उरलेली पास केल्यान.
पाचशेची नोट बघून कंडक्टर बोललोच. हा "चाकरमानी इलेहत" सुटे नायहत, वायच थांबा. बारक्यान सुचक नजरेत सासरेबुवांकडे बघल्यान. तरी भयनीचो लक्ष होतोच, ती पचाकलीच, बाळा सुटे? तेच्यावर सासरे बोलले "ते घेतील". बिचारा गप रवला. नविन जोडा खिडकेतून निसर्ग बघीत होता. आणि गाडीपण चढावाक लागली, तशी बाळ्याच्या डोक्यात युक्ती सुचाक लागली.
शेवटी पुढे पासून वारी करुन कंटक्टर अवतार धारण करुण मागे ईलो. आरडान आरडान तेचो घसो सुकलेलो. असरोन्डी मागे पडली, तशी बारक्याची चलबिचल सुरु झाली. हळूच संधी साधून बारक्यान अतिशय सभ्यपणे कंडक्टरकडसून उरलेले चारशे बावन्न रुपये घेतल्यान. आसान नसान भयन पाटी बघीत होती. बारको पोटातसून गाळी घालीत होतो.
शेवटी तेका होयी तशी संधी गावली. कालच्या कीर्तनाची माणसा देवळाच्या स्टॉपवर वर चढाक आणि गाड्येतली माणसा खाली उतराक एकच गर्दी झाली. आणि तेच्यातसून बारको सटाकलो.
दोन स्टॉप पुढे दुकानाकडे भयनीन जावयांका आणि सासर्यांका उतराक सांगल्यान. तरी तेची नजर बारक्याक शोधीत होती. उतारल्यावर सासरेबुवा विचारुक लागले, ते तुमचे हे कुठे? बिचार्या भयनीचा तोंड बघण्यासारखा झाला. तीना वेळ मारुन नेल्यान, तो मागे उतारलो आसतलो गावकरांका सांगाक्. देवळात गेलव काय गावतलो. बिचारो सासरो तसो हादारलोच. पण आशेवर रवलो.
आज दोन वर्षान चेडवाक झील झालो. सासरो वाट बघून थकलो, बारको काय कधी दिसलो नाय्, काय सासर्याची दमडी पण परत गावली नाय.
अकौंट वरचे पैशे
बारक्याची बायको पयल्या पासूनच हिकमती. सुरवातीच्या काळातच तीना अकौंट उघडलान. अकौंट तिच्या नावावर असला तरी बारक्याचा वारस म्हनून नाव होताच. आता बरेच पैसे जमा होते. बिचार्या बायकोन पै - पै जमऊन भरलेले. पैशे काढूक झाले हे बायकोपेक्षा बारक्याक आधीच म्हायत होते. रोज बायकोकडे टुमणा. कधी गोडीत तर कधी धमकी, मारझोड करता करता बायको काय दाढेक लागना. ती हुशारच. तीना कणकवलीच्या भाच्याक आणि मोठ्या भाओजीक सांगल्यान. रक्कम मोठी. तेव्हा 'दोघांनीय येतव, मग कायता बघूया', म्हनान फोन केल्यानी.
एक दिवस मोठो भाव सकाळीच घरात इल्लो बघून बारक्याचा मस्तकच फिरला. तो समाजलो. पण भावापुढे काय चलाचा नाय आणि पैशे सोडूचेय नाय. करायचा काय? शेवटी बँकेत जावची तयारी केली असा बघून बारको बँकेत हजर. मोठ्या भावाक वचकान असल्यामुळे बारको बाहेर बसलो.
झाला कागदपत्रा पुरी झाली. बायको आणि दीर कॅशियरकडे गेल्या बरोबर बारक्यान अवसान आणून रुद्रावतार धारण केल्यान "शुभल्या पैशे माझ्याकडे द्यायचे नायतर".
भावान मागे बघितल्यान तसो गप रवलो. भावान सांगल्यान "बँकेत तमाशा नको, भायर चल" तसो बारको खवाळलो. तुझो संबंध काय? करीत बघूक लागलो. बँकेत सगळ्यांकाच म्हायती. लोक आपले हसतत. तसो बारको गप रवलो.
पैशे घेवन बायको, दीर भायर इले. फक्त बारको पुढे सरसावलो, कडाक्याचा भांडण करुन बायको बरोबर हुज्जत घालूक लागलो. इतक्यात मोटारसायकल घेवन कणकवलीसून भाचो इलो. "ह्येका कसा समाजला" करीत बारक्यान आश्चर्यात बघल्यान. आता एकदम पवित्रो बदलून बारक्यान डोळ्यात पाणी भरल्यान्, भाच्याकडे दिनवाणा बघीत "बाळू तूच बघ?" करुन पायाकडे लोटांगण घातल्यान. रस्तावर ह्यो तमाशा. लोकांका सगळा म्हायतीच बारको काय माणूस, ताव म्हायती. तरी लोकांची सवय कोणतरी बोललो असा कसा तेका हजार भरतरी देवचे बापडे. बारक्याक आणखीनच चेव इलो.
आता मात्र भावाचो, भाच्याचो आणि बायकोचो नाईलाज होताना दिसाक लागलो. बारको तर काय सरड्यासारखे रंग बदलूक लागलो. शेवटी भावान पाचशे रुपये काढून दिल्यान. हे घे आणि चालू पड. त्या बरोबर बारक्यान मारामारीचो पवित्रो घेतल्यान. "शुभल्या बर्या बोलान संसार होयो आसात तर सगळे पैसे ह्यदी आणि हे पाचशे तुका ठेव". इतक्यात मघापासून गप असलेलो भाचो आता गाड्येवरसून उतारलो आणि बारक्याच्या गचाडेक धरल्यान एक सणसणीत बसल्याबरोबर बारको फरार झालो. रात्री बारको बेपत्ता दूसर्या दिवशी नाय खोडी सगळ्यांकाच माहिती.
मोठो भाव मुंबयक गेलो. तसो बारको हजर. बायको दिसल्या बरोबर "अगो xxxx देव देता आणि कर्म नेता, अशीच तुमची लायकी गो. पाचशे दिलास, पन्नास आकड्याक लावलय आणि हे बघ हजार हजार रुपयाचे चार नोटी दाखवत बोललो. स्वप्नच तसा पडलेला, आज लखपती होणार होतय. फुटक्या नशीबाचा तू आणि ते शाणे तूका गावले. आता मासक्यो मारा. माका काय गरज नाय तुझ्या पैशाची ". बायको बापडी अवाक होऊन बघीत रवली.











