श्री रवळनाथाची मनी ऑर्डर
वाडीच्या पोष्टात एक पत्र येता, सॉरटिंग करताना पोस्टमन पत्तो बघता तर "श्री देव रवळनाथ, मु.पो. स्वर्ग" सगळे हसतत, गंमत म्हणान पोस्टमन पुढचा वाचता "देवा रवळनाथा, बाबीच्या आयेचो नमस्कार. बाबी बायलेक घेवन मुंबैक गेलो तेवा पासून एक पैसो पाठवल्यान नाय तीन म्हयन्यात, माझी अगदीच इटमणा झाली रे देवा, माझ्या पोटा पाणयाचा काय करू? गेले दोन दिवस नुसती पेज आणि तोराची चटणी खावन काढलंय. काल मिरगाच्या दिवसाक सगळी कोंबडी सुदा चोरयेक गेली. काळू गाय लोकाचो तरवो खावन आपलो दिवस काढता. पण असा आणि किती दिवस चलताला? तेवा कायतरी सोय कर लवकर. वाट बगतंय."











